उल्हासनगर महापालिका मुकादम पोकलन मशिनच्या धक्क्याने गंभीर जखमी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 20:04 IST2021-05-31T20:04:25+5:302021-05-31T20:04:35+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ इंदिरानगर गॅस गोडाऊन परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता पावसाळ्या पूर्वीचे नाले सफाईचे काम पोकलन मशिनद्वारे सुरू होते.

उल्हासनगर महापालिका मुकादम पोकलन मशिनच्या धक्क्याने गंभीर जखमी; गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ परिसरात नालेसफाई सुरू असताना पोकलन मशीनचा धक्का लागून महापालिका मुकादम जखमी झाला. याप्रकरणी पोकलन चालका विरोधात उशिराने गुन्हा दाखल झाला असून कामगार संघटनेने पोखलन ठेकेदाराला दवाखान्यात येत असलेल्या खर्चाची मागणी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-५ इंदिरानगर गॅस गोडाऊन परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता पावसाळ्या पूर्वीचे नाले सफाईचे काम पोकलन मशिनद्वारे सुरू होते. त्यावेळी कामाची देखरेख करणारे महापालिका मुकादम संतोष दादू क्षेत्रे उपस्थित होते. पोकलन चालक त्येंबक ज्ञानदेव गाढवे यांनी पोकलन मशीन बंद करून मुकादम यांना नालीची भिंत पडते का बघा. असे सांगितले. मुकादम भिंत बघण्यासाठी फिरले असता, पोकलन चालकाने काही एक कल्पना न देता पोकलन मशीन सुरू केली.
मशीनचा जोरदार धक्का लागल्याने, छाती व बरगड्याला मार लागून फक्चर झाल्या. मुकादम संतोष क्षेत्रे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोकलन ठेकेदाराने रुग्णालयाचा सर्व खर्च करावा, अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी केले. महापालिका आयुक्तांना अशा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करून दवाखान्याचा खर्च ठेकेदाराने केला नाहीतर आंदोलनाचा इशारा साठे यांनी दिला. महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी सर्व प्रकारची चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.