उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीतील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा होणार स्थलांतरित, जिल्हाधिकाऱ्याने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 18:08 IST2026-04-04T18:07:51+5:302026-04-04T18:08:33+5:30
डॉ आंबेडकर यांचा पुतळा स्मशानभूमीत नको, अशी भुमिका अनेकांनी घेऊन आंदोलन सुरू केले होते.

उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीतील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा होणार स्थलांतरित, जिल्हाधिकाऱ्याने घेतली दखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमीत काही अज्ञात जणांनी लोकवर्गणीतुन विनापरवाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला. डॉ आंबेडकर यांचा पुतळा स्मशानभूमीत नको, अशी भुमिका अनेकांनी घेऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन, महापालिका आयुक्तानी पुतळा इतरत्र स्थलांतरीताचे आदेश दिले.
उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणीतून उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्मशानभूमी येथून काढून इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी शहरांत आंदोलन पेटले आहे. गेल्या महासभेत लक्षवेधी सूचनेद्वारे वंचित बहुजन पक्षाच्या गटनेत्यांनी पुतळा हटविण्याची मागणी केली. मात्र महापौर अश्विनी निकम यांनी वंचित बहुजन पक्षाची लक्षावेधी सूचना फेटाळल्याने, आंबेडकरांवाद्यानी संताप व्यक्त केला. त्यानंतर शहरात आंदोलनाला गती आली. सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी उपोषण सुरू केले. तर काही जणांनी मूक निदर्शने करून आंदोलन आक्रमक केले.
शहरांतील आंदोलनाची दखल अखेर जिल्हाधिकारी यांनी घेऊन, महापालिका आयुक्ताना पत्र पाठवून आपलेस्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे आदेश दिले. स्मशानभूमित विनापरवाना उभारलेला पुतळा हटविण्यास दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या प्रशासकीय कालावधी व कामकाज पद्धतीवर आंदोलनकर्त्यांनी प्रश्नचिन्हे उभे करून एकूणच त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहेत.