उद्धवसेना मनसेचा ठाण्यात निघाला पहिला एकत्रित मोर्चा, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटही मोर्चा झाला सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:06 IST2025-10-14T15:06:14+5:302025-10-14T15:06:35+5:30
ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारीवर्गाने तिला पोखरून टाकले.

उद्धवसेना मनसेचा ठाण्यात निघाला पहिला एकत्रित मोर्चा, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटही मोर्चा झाला सहभागी
ठाणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेना व मनसे यांनी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात राज्यातील पहिला मोर्चा सोमवारी काढून ठाकरेबंधूंच्या एकजुटीचे दर्शन घडवले. दोन्ही पक्षाचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला काँग्रेस व शरद पवार गट या महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला.
ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारीवर्गाने तिला पोखरून टाकले. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि ठाणेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलाे आहोत, असा नारा नेत्यांनी धडक मोर्चाच्या निमित्ताने दिला. यावेळी महापालिका आयुक्तांची नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
मोर्चानंतर पालिका मुख्यालयाजवळ संयुक्त सभा पार पडली. यावेळी उपस्थित नेत्यांनी भ्रष्टाचारविरोधाचा सूर आळवला. या मोर्चात उद्धवसेनेचे नेते आ. भास्कर जाधव, माजी खा. राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण महिला जिल्हाप्रमुख वैशाली दरेकर, दीपेश म्हात्रे, मनसेचे नेते अभिजित पानसे, शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रवक्ते राहुल पिंगळे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नेत्यांनी पालिका आयुक्तांना घेरले
नेत्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, पाणीटंचाईची समस्या, अनधिकृत बांधकामे, भ्रष्टाचार आदी मुद्द्यावरून राव यांना धारेवर धरले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
तक्रार करून कारवाई होत नाही, अनधिकृत बांधकामप्रकरणी दोषी
असलेल्या सहायक आयुक्तांवर काय कारवाई केली, कोणाच्या दबावाखाली काम करत आहात, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. निवडणूक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे यांना हटवा, त्यांची बदली का केली जात नाही, असा सवाल केला असता त्यांची बदली केली जाईल, असे आश्वासन राव यांनी दिले.
मतदार यादीवर काम सुरू आहे. मात्र, त्यात काही घोळ झाला, बोगस मतदार घुसवले, तर यावेळी त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा राजन विचारे यांनी दिला.