जिल्ह्यात दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणात झाले उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:38 IST2021-04-04T01:38:12+5:302021-04-04T01:38:29+5:30
२७५ शाळांतील बालकांची उपस्थिती अनियमित

जिल्ह्यात दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणात झाले उघड
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये व ग्रामीण भागातील गावपाड्यांत दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यामध्ये ४८ बालके शाळेत न गेलेले असून २७५ शाळांतील अनियमित बालके आहेत. तर, दोन हजार २५९ बालके स्थलांतरित होऊन जिल्ह्यात आल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाले आहे.
शाळाबाह्य, अनियमित, स्थलांतरित मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम घेण्यात आली. त्यादरम्यान जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनियमित बालकांसह शाळेत न गेलेले आणि जिल्ह्याबाहेरून आलेल्या मुलांचा समावेश आहे.
कामानिमित्त कामगार, मजूर हे प्रामुख्याने स्थलांतरीत होत असतात असे सांगण्यात आले.
जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत गेली एक हजार ५३४ बालके
जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांतून स्थलांतरित होऊन आलेल्या दोन हजार २५९ बालकांपैकी जिल्हांतर्गत ९६८ बालके आहेत. उर्वरित जिल्ह्याबाहेरील एक हजार दोन बालके आहेत. तर, राज्याबाहेरील २८९ बालके असून विशेष गरजाधिष्ठित दोन बालकांचा समावेश आहे.
या स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांप्रमाणेच जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत गेलेली एक हजार ५३४ बालके आहेत. यामध्ये जिल्हांतर्गत एक हजार ९१ बालके आहेत. जिल्ह्याबाहेरची २१५ बालके असून राज्याच्या बाहेर गेलेली २२८ बालके आहेत. तर, विशेष गरजाधिष्ठित पाच बालकांची सर्वेक्षणात नोंद घेतली आहेत.
३१९ जणांना प्रवेश दिल्याचा दावा
जिल्ह्यातील ३२३ शाळाबाह्य बालकांपैकी ३१९ बालकांना नजीकच्या शाळेत प्रवेश दिल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. उर्वरित चार बालके पुन्हा जिल्ह्याबाहेर स्थलांतरित झाल्याचे अहवालावरून दिसून येत आहे.