घोडबंदर भागात पातलीपाडा येथे संरक्षक भिंत घरांवर पडल्याने एकाचा मृत्यु , दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:58 IST2018-07-03T14:56:00+5:302018-07-03T14:58:24+5:30
नाल्याच्या बाजूला असलेली आरक्षित भुखंडाची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्देवी घटनेत एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली.

घोडबंदर भागात पातलीपाडा येथे संरक्षक भिंत घरांवर पडल्याने एकाचा मृत्यु , दोन जण जखमी
ठाणे - दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने सोमवार पासून पुन्हा बरसण्यास सुरवात केली आहे. या पावसामुळे धोकादायक भिंत पाच घरांवर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यु झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे.
सोमवार पासून ठाण्यात पुन्हा पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. मंगळवारी रात्रीपासूनच शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये पाच ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आगीची एक व अन्य १२ अशा एकूण २० तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती विभागाला प्राप्त झाल्या आहेत. परंतु यामध्ये एक संरक्षक भिंत पडल्याची देखील घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली आहे. नाल्याच्या बाजूला असलेल्या पाच झोपड्यांवर रात्री १२ च्या सुमारास ही भिंत पडली. यामध्ये प्रकाश वाळवे (३५) यांचा जागीचा मृत्यु झाला आहे. तर भारती वाळवे (२९) या गंभीर जखमी झाल्या असून समय जाधव हा १० वर्षीय मुलगा देखील यात जमखी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पालिका प्रशासनाला योग्य ते सहाकार्य करण्याच्या सुचना केल्या. दुसरीकडे ही भिंत पडल्याने येथील काही घरांमध्ये देखील नाल्याचे पाणी शिरले होते. परंतु आता या संरक्षक भिंतीच्या मुद्यावरुन अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. ज्या ठिकाणी ही संरक्षित भिंत उभी आहे, ती जागा पालिकेच्या टर्मनिलसाठी आरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पालिकेने हा भुखंड अद्याप ताब्यात घेतलाच नसल्याचा दावा पालिकेच्या सुत्रांनी केला आहे. संबधीत जागा मालकानेच ही कच्ची भिंत उभारली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
दरम्यान ही कमकुवत झालेली संरक्षक भिंत दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होती. परंतु ती न करण्यात आल्यानेच ही घटना घडली असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.