मोटारच्या धडकेत पोलिस हवालदारासह दोघे गंभीर जखमी
By जितेंद्र कालेकर | Updated: January 18, 2023 21:55 IST2023-01-18T21:55:23+5:302023-01-18T21:55:52+5:30
साकेत मैदानाजवळील घटना : राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मोटारच्या धडकेत पोलिस हवालदारासह दोघे गंभीर जखमी
ठाणे: एका मोटार कारच्या धडकेत ठाणे शहर मुख्यालयातील पोलिस अंमलदार लक्ष्मण देवाप्पा गायकवाड (३६) आणि परवाना शाखेचे वरिष्ठ लिपिक सुरेश रामराव घोळवे (३६) हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. संतोष शिंदे (४५, रा. राबोडी, ठाणे) या मोटारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
साकेत मैदान येथील पोलिस भरती बंदोबस्त पूर्ण करून ठाणे शहर आयुक्तालयातील घोळवे आणि गायकवाड हे दोघेही मोटारसायकलवरून साकेत गेट समोरून आयुक्तालयाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या या मोटार कारने त्यांना जोरदार धडक दिली. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी यांनी दिली.