'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:31 IST2025-11-10T10:31:12+5:302025-11-10T10:31:27+5:30
NEET Exam News: नीट परीक्षेतील गोंधळातून दोन मार्कलिस्ट मिळाल्याने भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून, त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे.

'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
भिवंडी : नीट परीक्षेतील गोंधळातून दोन मार्कलिस्ट मिळाल्याने भिवंडीतील एका विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना धक्का बसला असून, त्यातून नैराश्यग्रस्त होण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे.
शेलार गावातील यंत्रमाग कामगार कृष्णा पिनाटे यांची श्वेता ही मुलगी. २०२४ च्या नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने तिने खचून न जाता पुन्हा जोरदार अभ्यास करून २०२५ ची नीट परीक्षा दिली. १४ जून रोजी जाहीर झालेल्या ऑनलाइन निकालपत्रात श्वेता हिला ४९२ गुण होते. तर ७६,३१९ ही 'ऑल इंडिया रॅक' होती. आनंदित होत श्वेता हिने निकालाची ऑनलाइन प्रत काढून वैद्यकीय शिक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली. रजिस्ट्रेशन केले व त्यानंतर आलेल्या सिलेक्शन यादीत श्वेता हिच्या नावापुढे २७५ गुण व 'ऑल इंडिया रैंकिंग' ५,१८,१८० असे दाखवण्यात आले. हे पाहताच श्वेता व तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर तिने सीईटी सेल येथे चौकशी केली तर ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते त्यांच्याकडे चौकशी व तक्रार करा, असा सल्ला दिला. तिने १ नोव्हेंबर रोजी एमसीसी व एनटीए या संबंधित विभागासह केंद्रीय आरोग्य शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार केली; पण तिच्या तक्रारीचे निवारण केलेले नाही.
माझ्या यशावर फिरवले पाणी
मला ४९२ गुण असताना नंतर ते गुण २७५ कसे झाले, असा प्रश्न मला पडला असून माझी नक्की कोणती मार्कलिस्ट खरी आहे, हेच कळत नाही. मी केलेल्या मेहनतीवर नीट परीक्षा मंडळाने पाणी फेरले आहे. मी सतत दोन वर्षे वैद्यकीय प्रवेशासाठी अभ्यास केला; पण आज माझ्या हाती निराशा आली. माझे वडील मध्यमवर्गीय आहेत. लाखो रुपये फी भरून मला वैद्यकीय शिक्षण नाही देऊ शकणार. तर नीट परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे माझ्यासह सर्व कुटुंबीय नैराश्येत आले आहे, अशी प्रतिक्रिया श्वेता हिने दिली.