दोघांनी केला होता प्राणघातक हल्ला; अखेर...रणजित गायकवाड याचा १० दिवसाच्या झुंजीनंतर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 19:14 IST2025-12-14T19:14:18+5:302025-12-14T19:14:42+5:30
हल्लेखोर फरार असल्याने, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.

दोघांनी केला होता प्राणघातक हल्ला; अखेर...रणजित गायकवाड याचा १० दिवसाच्या झुंजीनंतर मृत्यू
उल्हासनगर: कॅम्प नं-४, संभाजी चौक परिसरात स्थानिक पत्रकार व समाजसेवक रणजित गायकवाड यांच्यावर १० दिवसापूर्वी जीवघेणा खुनी हल्ला झाला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. हल्लेखोर फरार असल्याने, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, तानाजीनगर मध्ये राहणारे समाजसेवक व पत्रकार रणजित गायकवाड हे कुटुंबातील काही सदस्यासह संध्याकाळी साडे सात वाजता संभाजी चौक परिसरातून जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लोखंडी रॉडने गायकवाड यांच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाल्याने, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोघांवर गुन्हा दाखल केला. जुन्या वादातून रणजित गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. दरम्यान गायकवाड याचे रविवारी पहाटे मृत्यू झाला.
विठ्ठलवाडी पोलिसांनी हल्लेखोरांना अद्याप अटक केली नसल्याने, पोलीस तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. जुन्या रागातून हल्ला केल्याचे, पोलिसांचे म्हणणे आहे. हल्लेखोराची पाश्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याला अद्याप अटक झाली नसल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल असे सुचक वक्तव्य केले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी हे संपर्कात बाहेर आहेत.