ठाण्यात दाेन बळी; रायगडला १ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 05:46 IST2025-05-27T05:46:41+5:302025-05-27T05:46:51+5:30
ठाणे शहर व परिसरात १० मिमी पाऊस पडल्याची नाेंद झाली

ठाण्यात दाेन बळी; रायगडला १ ठार
ठाणे/अलिबाग : जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद कमी झाली असली तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाल्याचे चित्र होते. त्यातच सोमवारी उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक काेलमडल्यामुळे नोकरदारांचे हाल झाले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत मुरबाड तालुक्यामध्ये सर्वाधिक ५८ मि.मी. पाऊस पडला आहे. याखालाेखाल ठाणे शहर व परिसरात १० मिमी पाऊस पडल्याची नाेंद झाली आहे. मात्र पावसाने जिल्ह्यात दोघांचे बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुरबाड तालुक्यातील इंदे येथील दहावी उत्तीर्ण झालेला १९ वर्षीय यश रमेश लाटे याचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला, तर अंबरनाथ तालुक्यातील चिखलाेली धरणात बुडून अविनाश कुंडलिक भोईर याचा मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात सोमवारी सकाळी अंगावर वीज कोसळून रोशन कालेकर या तरुणाचा मृत्यू झाला. तो फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली.
मुरबाडच्या कांदळी येथील दाेन दुधाळ म्हशी व कल्याणच्या फळगांव येथील चार वासरे वीज पडून दगावली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.