घराजवळ दारू पिण्यास मज्जाव केल्याने बदलापूर गावात दोन सख्या भावांना टोळक्याची मारहाण
By पंकज पाटील | Updated: November 12, 2022 17:17 IST2022-11-12T17:17:07+5:302022-11-12T17:17:46+5:30
घराजवळ बसून दारू पीत असलेल्या टोळक्याला हटकल्याने या टोळक्याने दोन भावांना मारहाण केल्याची घटना बदलापूर गावात घडली आहे.

घराजवळ दारू पिण्यास मज्जाव केल्याने बदलापूर गावात दोन सख्या भावांना टोळक्याची मारहाण
पंकज पाटील
बदलापूर : घराजवळ बसून दारू पीत असलेल्या टोळक्याला हटकल्याने या टोळक्याने दोन भावांना मारहाण केल्याची घटना बदलापूर गावात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. बदलापूर गावात गणेश सकपाळ हे वास्तव्याला असून ८ नोव्हेंबर रोजी योगेश सोनवणे आणि अन्य काही जण गणेश यांच्या घराजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. त्यामुळे गणेश यांनी त्यांना हटकत इथे दारू प्यायला बसू नका, असे सांगितले.
त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन दारू पिण्यास बसलेले इसम तिथून निघून गेले. मात्र काही वेळाने राजेश आणि अन्य चार ते पाच जण पुन्हा तिथे आले आणि त्यांनी गणेश सकपाळ यांच्या मोठ्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. त्यामुळे गणेश हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले असता या चार ते पाच जणांच्या टोळक्याने गणेश याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गणेश यांच्या डोक्याला आणि इतरत्र इजा झाली असून त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गणेश यांच्या जबानीवरून मारहाण करणारे राजेश आणि त्याचे अन्य चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात जबर दुखापत पोहोचवणे आणि मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"