नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे वय २७ रा. टिटवाळा, ता. कल्याण व सोहेल उर्फ पित्तल इरफानअली अन्सारी वय २० रा. भिवंडी अशी अटक केलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. त्यांच्याकडून एका पिस्तूल आणि काडतूससह ४ किलो ८२७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने मंगळवारी दिली आहे.
१७ सप्टेंबर रोजी २ इसम भिवंडीतील के.बी चौक ते ताडाळी दरम्यान गांजाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सपोनि सुनिल साळुंखे यांना मिळाली होती.त्यानुषंगाने सुनिल साळुंखे यांनी पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीराज माळी,मिथुन भोईर, पोउनि रविंद्र बी. पाटील,राजेश शिंदे,रामचंद्र जाधव, सपोनि सुधाकर चौधरी,सुनिल साळुंके, पोह निलेश बोरसे, पोह.साबीर शेख, सुदेश घाग, किशोर थोरात, वामन भोईर, राजेश गावडे, मपोह माया डोंगरे, पोशि अमोल इंगळे, भावेश घरत, सर्फराज तडवी, चापोशि रविंद्र साळुंखे आदी पोलिस पथकासह पंचांसमक्ष सापळा रचून छापा कारवाई केली असता प्रशांत आणि सोहेल हे दोघे स्कुटरमधून गांजाची विक्रीसाठी भिवंडीत आल्याचे छाप्या दरम्यान आढळून आले.
त्यांना त्याब्यात घेत चौकशी करीत असतानाच प्रशांतच्या घराच्या झाडझडतीत गुन्हे शाखेला एक पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस सापडल्याने आरोपींकडून गुन्हे शाखेने एकूण ३ लाख ८५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.