ठाण्यात गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:35 IST2019-03-19T22:24:29+5:302019-03-19T22:35:46+5:30
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावठी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांवर ठाणे पोलिसांनी एक मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून वर्तकनगर येथून एका महिलेला तर कोपरीतून एका दारु विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कोपरी आणि वर्तकनगरमध्ये पोलिसांची कारवाई
ठाणे : गावठी दारूची विक्री करणा-या तंगीबाई साठे (६३, रा. भिमनगर झोपडपट्टी, वर्तकनगर, ठाणे) या महिलेसह दोघांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वर्तकनगर आणि कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भीमनगर सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागील भागात साठे ही महिला गावठी दारूची विक्री करीत असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांना मिळाली होती. त्या आधारे महिला पोलीस कॉन्स्टेबल पायल धुर्वे यांच्या पथकाने १८ मार्च रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास भीमनगर भागातून एका प्लास्टिकच्या पिशवीतील देशी दारूच्या १५ बाटल्यांसह तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर अन्य एका घटनेमध्ये कोपरीगाव शेलार चाळीच्या बाजूला गावठी दारूची विक्री करणाºया विकास सावंत (३४) याला १८ मार्च रोजी कोपरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल काशिलिंग खरात यांच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून १० लीटर गावठी दारूचा कॅन आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमधील २०० मिली लीटर दारू जप्त केली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.