रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 21:55 IST2018-12-06T21:40:00+5:302018-12-06T21:55:37+5:30
अमली पदार्थांच्या नशेसाठी पैसे हवे असल्यानं लूट करून हत्या

रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
मीरारोड - रिक्षा चालकास लुटण्यासाठी त्याची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमली पदार्थांच्या नशेचे व्यसन असल्याने त्यासाठी पैसे हवेत म्हणून आरोपींनी रिक्षा चालकाची हत्या केली. काशिमीरा पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
दहिसरच्या रावळपाडा येथे राहणारा रिक्षा चालक संजय धनेश्वर यादव (२८) हा जखमी अवस्थेत १८ ऑक्टोबर रोजी मीरा-गावठणमधील श्याम इंडस्ट्रीय इस्टेटजवळ आढळला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रिक्षातून उतरताना तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अंदाजानुसार काशिमीरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
यादवचा मोबाईल तसेच रोख गायब असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटचे निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर व पथकाने तपास सुरु केला. यादवच्या मोबाईलवरुन झालेल्या कॉलच्या आधारे पोलिसांनी तपास करत असताना उद्धव उर्फ रुद्र श्रीकांत उकरंडे (१९) व विकास उर्फ सर्किट सुरेश परेड (१९) दोघेही रा. महाजन वाडी, काशिमीरा यांना ताब्यात घेतले. चौकशीत यादवचा मोबाईल आरोपींकडे सापडला.
१७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास उद्धव व विकास हे एका हॉटेलजवळून यादवच्या रिक्षात बसले. त्याला ठाकूर मॉलजवळील श्याम इंडस्ट्रीयलच्या मागे निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याला मारहाण करुन भिंतीवर डोके आपटले. यानंतर यादवकडचे ९०० रुपये व मोबाईल घेऊन दोघे पसार झाले होते.