Two absconding accused arrested: Varkkanagar police action | खंडणीतील फरारी दोन आरोपींना अटक: वर्तकनगर पोलिसांची कारवाई

गेल्या सात महिन्यांपासून होते पसार

ठळक मुद्देगेल्या सात महिन्यांपासून होते पसारहॉटेल व्यवसायिकाकडे मागितली होती २५ हजारांची खंडणीदोन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन दिली ठार मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका हॉटेल व्यावसायिकाला २५ हजारांच्या खंडणीची मागणी करुन त्याला मारहाण करुन पसार झालेल्या अशोक कांबळे (३५) आणि सचिन घरबुडवे (३७) या दोघांना नुकतीची वागळे इस्टेट भागातून वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
खंडणी प्रकरणातील अशोक आणि सचिन हे दोघेही आरोपी हे वागळे इस्टेट भागात फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस नाईक सुनिल निकम, प्रदीप चौधरी आणि पोलीस हवालदार संदीप भोसले आदींच्या पथकाने या दोघांनाही १५ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्यांना १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या दोघांनाही १८ आॅक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. सुप्रित भंडारी (३३, रा. कळवा, ठाणे) हे नोकरीला असलेल्या ठाण्यातील उपवन भागातील सुरसंगित बार अ‍ॅन्ड रेस्टॉरन्टच्या बाहेर २४ मार्च २०१९ रोजी बसले होते. त्यावेळी या हॉटेल मालकाने २५ हजारांची खंडणी न दिल्याच्या रागातून मंगेश सदरे याने प्रसाद शेट्टी, नरेंद्र भडांगे, अशोक कांबळे आणि सचिन आदी १५ ते १६ साथीदारांच्या मदतीने विनोद पाटील कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर या टोळक्याने भंडारी यांना मारहाण केली होती. त्यावेळी त्यांच्या मदतीला आलेल्या सूरज याच्याही हातावर ब्लेडने वार करुन त्याला जखमी केले होते. त्यानंतर हॉटेल बंद करा, असे बोलून हॉटेलचे गेट जबरदस्तीने ओढून ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी मंगेश सदरे याच्यासह १२ ते १३ जणांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, हाणामारी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्रसाद शेट्टी आणि नरेंद्र भडांगे या दोघांना २५ मार्च २०१९ रोजी तर मंगेश सदरे याला २४ एप्रिल २०१९ रोजी अटक झाली आहे. यातील अन्यही फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Two absconding accused arrested: Varkkanagar police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.