वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठीचा टग उलटला, एक बेपत्ता; पाच जणांना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:42 IST2025-11-12T19:39:46+5:302025-11-12T19:42:22+5:30
Wadhwan Port Project: मागील काही दिवसांपासून वाढवण, तारापूर गावाच्या समुद्रात १९ डिग्री ५७.५ N ०७२ डिग्री ३५.४E अंतरावर एक तराफा उभारण्यात आला.

वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठीचा टग उलटला, एक बेपत्ता; पाच जणांना वाचवण्यात यश
- हितेन नाईक, पालघर
वाढवण बंदर भराव सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यासाठी साठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा अमृत XVI हा लोखंडी टग समुद्रात गेला होत. बुधवारी मध्यरात्री समुद्राला आलेल्या भरतीमुळे तो खडकावर आदळला आणि उलटला. पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात राहुल यादव (वय 23 वर्ष) हा कामगार समुद्रात फेकला गेला. तो बेपत्ता असून, अन्य ५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाढवण बंदराचे कुठलेही काम स्थानिकांच्या विरोधामुळे आजपर्यंत सुरू झालेले नसून, समुद्रात बंदर उभारणीच्या अनुषंगाने वेगवेगळे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वाढवण, तारापूर गावाच्या समुद्रात १९ डिग्री ५७.५ N ०७२ डिग्री ३५.४E अंतरावर एक तराफा उभारण्यात आला.
त्याला खेचून नेण्याचे काम करण्यासाठी डहाणू येथून गेलेल्या एका स्थानिक मच्छीमार बोटीला भाडे तत्त्वावर नेण्यात आले होते. मात्र, वरोर येथील स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊन त्या डहाणू येथील बोटीला परत जाण्यास भाग पाडले. त्यामुळे आठ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा अमृत नावाचा १६ मीटर लांब टग ६ खलाशी कामगारासह मदतीला पाठविण्यात आला होता.
समुद्रात गेल्यानंतर काय घडलं?
बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती येऊ लागल्याने हा टग वाढवण बंदराच्या समोरील शंखोद्वार समोर खडका जवळ उभा असताना समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार लाटांनी हेलकावे खाऊन उलटला.
त्यातील ६ कामगारांनी आपले प्राण वाचविण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. परंतु राहुल कुमार यादव या कामगाराने मारलेल्या उडी नंतर टग त्याच्या अंगावर उलटल्यामुळे तो समुद्रात बेपत्ता झाला असावा, असा तर्क अन्य कामगारांनी व्यक्त केल्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी लोकमतला सांगितले.
वाढवण बंदर भरावाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा अमृत XVI हा तराफा समुद्रात असतानाच बुधवारी मध्यरात्री भरतीमुळे खडकावर आदळला आणि उलटला. पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात राहुल यादव (वय 23 वर्ष) हा कामगार बेपत्ता झाला असून, अन्य ५… pic.twitter.com/H3hM3zMoiT
— Lokmat (@lokmat) November 12, 2025
या घटनेनंतर समुद्रात फेकल्या गेलेल्या पवन कुमार देवराम (वय २९, रा. बिहार), धर्मेंद्र कुमार सिंग (वय ४३, बिहार), गोविंद कुमार महतो (वय १९ वर्ष, बिहार), सुरज विश्वकर्मा (वय ३७, रा.उत्तर प्रदेश), जशन पठाणिया (वय २०, रा.पंजाब) या पाच कामगारांना बाजूच्या टगमधील कामगारांनी वाचवले.
समुद्रात बेपत्ता झालेल्या राहुल यादव या कामगाराचा शोध घेण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व मच्छीमार आणि सहकारी संस्थांना आवाहन करून अशी व्यक्ती समुद्रात आढळून आल्यास तात्काळ आपल्या कार्यालयाला किंवा संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन केले आहे.
पाच कामगारांना सकाळी डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली.