औरंगाबादमध्ये मिळाला ठाण्यातून चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:51 IST2020-10-22T22:45:04+5:302020-10-22T22:51:41+5:30
ठाण्यातून चोरीस गेलेल्या एका ट्रकला औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथून ताब्यात घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. ट्रकला असलेल्या जीपीएसमुळे ही चोरी पकडली गेली. मात्र, पोलीस मागावर असल्याचे समजल्यामुळे चोरटयाने मात्र पोबारा केला.

चोरटयाची हुलकावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील माजीवडा भागातील मुंबई नाशिक मार्गावरुन चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथील एका ढाब्यावरुन आणण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे. या ट्रकच्या चोरटयाने मात्र पोलिसांना हुलकावणी दिली आहे. त्याचा अद्यापही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या ट्रकचे चालक बंधू भाटकर यांनी १७ आॅक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई -नाशिक राष्ट्रीय मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाच्याजवळ हा ट्रक उभा केला होता. १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते ट्रकजवळ गेले. तेंव्हा तिथून ट्रक चोरीस गेल्याचे आढळले. याप्रकरणी भाटकर यांनी तात्काळ कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने या चोरीचा तपास सुरु केला. तेंव्हा ट्रकला असलेल्या जीपीएस यंत्रणेच्या आधारे तो औरंगाबाद जिल्हयातील वैजापूरपासून जवळच असलेल्या एका ढाब्याच्या ठिकाणी उभा असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी वैजापूर पोलिसांच्या मदतीने हा ट्रक १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. मात्र, ट्रक चोरी करणाऱ्याने तिथून पलायन केले होते. हा ट्रक आता मुळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ट्रकची चोरी करणाºयाचा मात्र अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.