अभिनेता खेसारी लाल यादव अडचणीत; ठाण्यातील घराला 'अनधिकृत बांधकामा'ची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:58 IST2025-11-06T15:19:48+5:302025-11-06T15:58:51+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असून भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यांच्या मतदारसंघातही मतदान होत आहे.

अभिनेता खेसारी लाल यादव अडचणीत; ठाण्यातील घराला 'अनधिकृत बांधकामा'ची नोटीस
Bihar Election: भोजपुरी अभिनेता-गायक आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार खेसारी लाल यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी छपरा मतदारसंघात मतदानाचा पहिला टप्पा पार पडत असतानाच, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या घरावर अनधिकृत बांधकामासंदर्भात मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना, ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर महानगरपालिकेने खेसारी लाल यादव (शत्रुघ्न कुमार यादव) यांना त्यांच्या मीरा रोडवरील घरातील कथित अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस बजावली आहे. ही नोटीस ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. खेसारी लाल यांच्या घरावर बसवण्यात आलेले लोखंडी अँगल आणि टिनचे छत (पत्राशेड) हे अनधिकृत बांधकाम मानले गेले आहे.
महानगरपालिकेने खेसारी लाल यांना हे अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. जर त्यांनी हे बांधकाम स्वतःहून काढले नाही, तर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग थेट कारवाई करेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
निवडणुकीमुळे घर बंद, कारवाईची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार निवडणुकीमुळे खेसारी लाल यादव यांचे संपूर्ण कुटुंब सध्या बिहारमध्ये आहे. त्यामुळे मीरा रोडवरील त्यांचे घर सध्या बंद आहे. जर वेळेत हे अवैध बांधकाम हटवले गेले नाही, तर मीरा-भाईंदर महानगरपालिका अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वडिलांचा खिसा कापला
निवडणुकीच्या धामधुमीत खेसारी लाल यादव यांना आणखी एका घटनेचा फटका बसला आहे. २ नोव्हेंबर रोजी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रिविलगंजमध्ये खेसारी लाल यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या जाहीर सभेनंतर मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन एका खिसेकापूने खेसारी लाल यांचे वडील मंगरू यादव यांचा खिसा कापला होता.
बिहार निवडणुकीच्या तोंडावर एका बाजूला वडिलांची खिसेकापी आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातून अनधिकृत बांधकामाची नोटीस, अशा दुहेरी संकटात भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव सापडले आहेत.