Transport election to be held online, Konkan Divisional Commissioner's letter to KDMC | परिवहन निवडणूक होणार आॅनलाइन, कोकण विभागीय आयुक्तांचे केडीएमसीला पत्र

परिवहन निवडणूक होणार आॅनलाइन, कोकण विभागीय आयुक्तांचे केडीएमसीला पत्र

कल्याण : केडीएमसीचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कालावधी मार्चमध्ये संपुष्टात आला. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावात नव्या सभापतीची निवड होऊ शकलेली नाही. ही रखडलेली निवडणूक आता आॅनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांनी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची नियुक्ती केली आहे. निवडीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, ही राज्यातील पहिलीच आॅनलाइन निवडणूक ठरणार आहे. परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. समितीमधील शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने शिवसेनेची एक जागा रिक्त आहे. जानेवारीमध्ये झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि मनसेच्या मदतीने हे पद भाजपला मिळाले. यात शिवसेनेच्या एका सदस्याची अनुपस्थितीही भाजपच्या पथ्यावर पडली. त्यामुळे परिवहन सभापतीपद आपल्याकडेच राखण्याचा चंग बांधणाऱ्या शिवसेनेचे मनसुबे धुळीस मिळाले असून, संख्याबळ पाहता निवडणुकीत भाजपचेच पारडे जड राहणार आहे. भाजपचे सदस्य संजय राणे, संजय मोरे आणि प्रसाद माळी हे दावेदार आहेत.

निवडणुकीची तारीख लवकरच होणार जाहीर

कोकण विभागीय आयुक्तांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र पाठविले आहे. पालघरचे जिल्हाधिकारी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, ते लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर करतील. कोकण विभागीय आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइनद्वारे पार पडणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आॅनलाइन पद्धतीने निवडणूक होणार असून आम्ही आमच्या तयारीला सुरुवात केली आहे, अशी माहिती केडीएमसीचे सचिव संजय जाधव यांनी दिली. पहिली सभा सभापती निवडीचीच होईल. शिवसेनेचे सदस्य यशवंतराव यांच्या निधनाने रिक्त झालेले पद हे महासभेद्वारे भरले जाईल, असेही जाधव म्हणाले.

Web Title: Transport election to be held online, Konkan Divisional Commissioner's letter to KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.