ठाणे जि.प.च्या अतिरिक्त सीईओंची बदली; कल्याणलाही मिळाले बीडीओ
By सुरेश लोखंडे | Updated: February 24, 2024 18:51 IST2024-02-24T18:51:05+5:302024-02-24T18:51:17+5:30
करूणा जुईकर यांची आता ठाणे जिल्हा परिषदेत बदली झाली आहे.

ठाणे जि.प.च्या अतिरिक्त सीईओंची बदली; कल्याणलाही मिळाले बीडीओ
ठाणे : मंत्रालयीन ग्राम विकास विभागाने येथील जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) व अतिरिक्त सीईओ डाॅ. रूपाली सातपुते यांची जिल्हा परिषद जालना येथे बदली केली आहे. त्यांच्या जागी आता काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर महापालिकेत उपायुक्त असलेल्या व त्यानंतर पालघर जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालकपदी विराजमान झालेल्या करूणा जुईकर यांची आता ठाणे जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. त्या आता प्रभारी सीईओ व अतिरिक्त सीईओपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रभारी सीईओ, अतिरिक्त सीईओ प्रमाणेच कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ) रिक्तपदी पल्लवी सस्ते यांची वर्णी लागली आहे. त्या आधी डहाणू पंचायत समितीच्या बीडीओ हाेत्या. याप्रमाणेच ठाणे जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक पद काही महिन्यापासून रिक्त आहे. आता त्या जागी अतुल पारसकर यांची वर्णी लागली आहे. ते आधी पालघर येथील जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक पदाचे जबाबदारी पार पाडत हाेते.