जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या बदल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:24 IST2019-06-19T23:24:43+5:302019-06-19T23:24:51+5:30
रद्द करण्याचे कारण गुलदस्त्यात; आवडीच्या शाळेचे स्वप्न भंगणार

जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या बदल्या रद्द
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या मोठा गाजावाजा करून समुपदेशनाने केलेल्या बदल्या अवघ्या पाच दिवसांतच रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बदल्या कोणत्या कारणामुळे रद्द केल्या, याबाबतचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे आवडीच्या शाळा मिळण्याचे शिक्षकांचे स्वप्न भंगल्याची चर्चा आहे.
बदलीच्या अन्यायाविरोधात न्यायालयात गेलेल्या व बदलीबाबत अपिलात गेलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया १४ जून रोजी एनकेटी सभागृहात पार पडली. यावेळी ठाणे जि.प. उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे आणि शिक्षणाधिकारी संगीता भागवत उपस्थित होते.
जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोयीच्या शाळा घेतल्याचा आरोप करून १०९ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच जिल्हांतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंग शिक्षकास लांबची शाळा मिळाली, अवघड क्षेत्र आदी विविध बाबींसाठी ६२ शिक्षकांनी अपील केले होते. या सर्व प्रकरणावर कोकण विभागीय आयुक्तांच्या दालनात सुनावणी झाली. त्यानंतर, शुक्रवारी या सर्व शिक्षकांचे समुपदेशन करून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन मुख्याध्यापक, ४४ पदवीधर आणि ११० शिक्षकांचा समावेश होता. त्यापैकी १९ शिक्षकांनी पूर्वी बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र, नंतर त्यांनी ते अर्ज मागे घेतले. त्यामुळे ते १९ शिक्षक सोडून १३७ प्राथमिक शिक्षकांच्या पारदर्शकपणे बदल्या झाल्या. शिक्षकांना त्यांच्या मागणीनुसार शाळा मिळाल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र, अवघ्या पाचच दिवसांत या बदल्या रद्द झाल्या.
न्यायालयात धाव घेतलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रि येत प्राधान्यक्र म दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशात तसे नसतानादेखील आपण तसा निर्णय दिला होता. तसेच बदली झालेल्या शिक्षकांना आदेशदेखील देण्यात आले नाहीत. त्यामुळे ही प्रक्रि या रद्द करून कोणताही प्राधान्यक्र म न ठेवता केवळ सेवाज्येष्ठतेसह नव्या नियमानुसार पुन्हा बदली प्रक्रिया राबवण्यात येणार असून पालघरहून विकल्पाने आलेल्या ९४ शिक्षकांचीदेखील समुपदेशनाने बदली करण्यात येणार आहे.
- संगीता भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. ठाणे