मुंबई-नाशिक महामार्गावर सहा तास वाहतूककोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 05:55 IST2025-01-06T05:54:51+5:302025-01-06T05:55:40+5:30
मालवाहू ट्रक बंद पडल्याने वाहतूककोंडीची समस्या

मुंबई-नाशिक महामार्गावर सहा तास वाहतूककोंडी; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी सातपासून वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास व्यत्यय येत होता. दुपारी एक वाजता म्हणजेच सहा तासांनंतर महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील कोंडी सुटल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास जुन्या कसारा घाटातील झिरो पॉईंट वळणावर कंटेनर उलटल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यात रविवारी सकाळी मालवाहू ट्रक बंद पडला. बेशिस्त वाहनचालकांमुळे तो रस्ताही जाम झाला. सकाळी सातपासून वाहनचालक, पर्यटकांना मनस्ताप सोसावा लागला. नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मार्गिकेवर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसारा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलिस, आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य तब्बल सहा तास मेहनत घेत होते.
२० हून अधिक वाहने बंद
- मुंबई-नाशिक महामार्ग सहा तासांनंतर सुरू झाला. मात्र, जवळपास २० हून अधिक लहान-मोठी वाहने रस्त्यात बंद पडली.
- त्यामुळे कासवगतीने सुरू झालेला महामार्ग पुन्हा विस्कळीत झाला.
कसारा घाटात नियमित होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग, स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत बैठक घेऊन वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात येईल.
- मिलिंद शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहापूर
कसारा घाटात अपघात झाल्यास वाहतूककोंडी होते. अवजड वाहनांसाठी काही वेळांसाठी कसारा घाटाच्या पायथ्याशी पार्किंग व्यवस्था केल्यास वाहतूककोंडी होणार नाही. वाहनचालकांची गैरसोय कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर