कल्याण : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या बोगस टीसीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव सोमनाथ माळी असून, त्याला बुधवारी कामयानी एक्स्प्रेसमध्ये पकडण्यात आले.
कामयानी एक्स्प्रेसमध्ये सोमनाथ प्रवाशांचे तिकीट तपासत होता. त्यावेळी काही प्रवाशांना संशय आला. प्रवाशांनी विचारपूस करताच तो काहीसा घाबरला. त्याने प्रवाशांकडून घेतलेले पैसे आणि पावती पुस्तक गाडीबाहेर फेकले. यावेळी प्रवाशांनी त्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. सोमनाथला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राहणारा आहे. त्याने प्रवाशांकडून किती पैसे उकळले आहेत, याचा पोलीस तपास घेत आहेत. सध्या रेल्वेगाडीत ओळखपत्र असल्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नाही. असे असताना सोमनाथ रेल्वे गाड्यांमध्ये कसा काय घुसत होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.