वीज दर कमी करण्याचे अधिकार टोरंटला नाहीत; कंपनीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 23:53 IST2019-11-01T23:52:42+5:302019-11-01T23:53:09+5:30
खासगीकरणामुळे अखंड वीज

वीज दर कमी करण्याचे अधिकार टोरंटला नाहीत; कंपनीचा दावा
ठाणे : कळवा-मुंब्रात महावितरणचे खाजगीकरण केले नसून खासगी सहभागाने व भांडवलाने वीजवितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठीची व्यवस्था केली आहे. तसेच टोरंट पॉवरचे दर जास्त असल्याचे सांगितले जात असली तरी ते एमईआरसीने निश्चित केले असून त्यात टोरंटची कोणतीही भूमिका नसून एकदा ठरविलेले दर बदलण्याचे कोणतेही अधिकार कंपनीला नाहीत, असा दावाही टोरंटने शुक्रवारी केला. गुरुवारी कळवा-मुंब्रा-शीळ-दिवा परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून टोरेन्ट हटावची मागणी केल्यानंतर कंपनीने शुक्रवारी हे स्पष्टीकरण केले.
वीज यंत्रणेत सुधारणा करून ग्राहकांना २४ बाय ७ तास योग्य दाबाने वीजपुरवठा करणे व वापरलेल्या युनिटसची योग्य व रास्त दराने वीज बिल आकारणे हेच ध्येय असल्याचेही टोरंट कंपनीने म्हटले आहे. तसेच टोरंटचे मीटर जास्त गतीने विजेची नोंद घेतात, हे निराधार असल्याचाही दावा कंपनीने केला. बिल भरले नाही तर ग्राहकांना प्रथम नोटीस दिली जाते. तिची मुदत संपल्यानंतरच वीज खंडित केली जाते. यात एसएमएसद्वारे तसेच फोन कॉल्सद्वारेही थकबाकीची आठवण करून देते. प्रचलित नियमांनुसारच वीजसेवा खंडित केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खाजगीकरणाला विरोध
कळवा-मुंब्रा-शीळ-दिवा या परिसरातील वीजगळती कमी करण्यासाठी या परिसरात टोरंट कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
या भागातील नागरिकांनी मात्र टोरंट कंपनीला जोरदार विरोध केला असून टोरंट हटावचा नारा दिला आहे.