कळव्यामध्ये तीन दिवसात तीन महिलांचे मोबाईल हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 18:26 IST2021-03-02T18:19:03+5:302021-03-02T18:26:12+5:30
कळवा परिसरात तीन दिवसात तीन वेगवेगळया महिलांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून चोरटयांनी पलायन केल्याची घटना घडली.

कळवा पोलीस ठाण्यात तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा परिसरात तीन दिवसात तीन वेगवेगळया महिलांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून चोरटयांनी पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत पारसिकवाडी, इंदिरानगर येथे राहणारी १८ वर्षीय तरुणी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ७ ते ७.२५ वाजण्याच्या सुमारास मफतलाल तलावाच्या समोरुन मोबाईलवर बोलत पायी जात होती. त्याचवेळी तिथे आलेल्या एका चोरटयाने तिच्या हातातील मोबाईल खेचून तिथून पलायन केले. दुसरी घटना कळवा इंदिरानगर भागात घडली. २६ फेब्रुवारी रोजी ३२ वर्षीय महिला रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर येथून पायी जात असतांना तिच्या हातातील सात हजारांचा मोबाईल एका चोरटयाने जबरीने हिसकावून पलायन केले. तर तिसऱ्या घटनेत खारेगाव भागात राहणारी २५ वर्षीय महिला २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मफतलाल तलावाच्या समोरुन मोबाईलवर बोलत जात होती. त्याचवेळी एका अनोळखी चोरटयाने तिच्या हातातील १८ हजारांचा मोबाईल हिसकावून पलायन केले. या तिन्ही घटनेबाबत कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंगळवारी कळवा पोलिसांनी दिली.