ठाणे : कोरोनाकाळात अंत्यविधी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या ठाण्यातील एकमेव जवाहरबाग स्मशानभूमीतील चारपैकी तीन इलेक्ट्रिक शवदाहिनी मशिन बंद असल्याची बाब समोर आली आहे. मागील दोन महिन्यांपासून या मशिन बंद असल्याची माहिती येथील कामगार प्रतिनिधींनी दिली आहे. एक मशिन सुरू असली तरीदेखील लाकडावर अंत्यविधी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून दुसरी लाट ओसरत आली असताना शहरातील चार स्मशानभूमींतच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी केला जात आहे. त्यातील शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जवाहरबाग स्मशानभूमीवर मधल्या काळात ताण वाढला होता. येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना दोन ते तीन तास ताटकळत थांबावे लागत होते. या ठिकाणी मधल्या काळात २२ ते २५ अंत्यविधी दिवसाला होत होते. या ठिकाणी चार इलेक्ट्रिक शवदाहिनी आहेत. त्यातील दोन मशिन बंदच होत्या. त्यामुळे दोन मशिनवर ताण येत होता. आता चारपैकी तीन मशिन मागील दोन महिन्यांपासून बंदच असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या शवदाहिनी दुरुस्तीसाठीदेखील वारंवार संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. मात्र त्याच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता दिवसाला तीन ते चार अंत्यविधी होत असले तरी तेदेखील लाकडावर केले जात आहेत. किंबहुना लाकडावर अंत्यविधी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हा दबाव नेमका कशासाठी आणला जात आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.