ठाण्याच्या किसननगरात चोऱ्या करणारे त्रिकूट जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 00:04 IST2020-09-16T23:59:06+5:302020-09-17T00:04:59+5:30
किसननगर भागात चो-या करणा-या साई ऊर्फ दशरथ हराळे , प्रदीप दळवी ऊर्फ बाबू आणि सुरज यादव या तीन सराईत चोरट्यांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली.

श्रीनगर पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट, किसननगर भागात चो-या करणा-या साई ऊर्फ दशरथ दिनकर हराळे (२५, रा. शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे), प्रदीप बाळकृष्ण दळवी ऊर्फ बाबू (३०, रा. किसननगर, क्रमांक-३, ठाणे) आणि सुरज जिलेदार यादव (२०, रा. किसननगर, ठाणे) या तीन सराईत चोरट्यांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांनी चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून किसननगर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. किसननगर क्रमांक-३, भटवाडी येथील रहिवासी सुनील चौगुले यांच्याकडे २२ आॅगस्ट २०२० रोजी दुपारी ३ ते २७ आॅगस्ट रोजी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा एक लाख ११ हजारांचा ऐवज चोरी झाला होता. या तक्रारीचाही पोलीस तपास करीत होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी श्रीनगर आणि किसननगर भागात गस्तीचे प्रमाण वाढविले. खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काही सराईतांची त्यांना माहिती मिळाली. साई, प्रदीप आणि सुरज हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्यांची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे यांच्या पथकाने केली. कोपरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह या तिघांनाही ५ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी या घरफोडीसह एका टपरीतील चोरी तसेच मोटारसायकलीच्या चोरीचीही कबुली दिली. ठाणे न्यायालयाने त्यांना २० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींकडून एक मोटारसायकल, काही रोकड आणि एक सोनसाखळी असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
यातील प्रदीप दळवी या आरोपीने २०१९ मध्ये पडवळनगर येथील पंचपरमेश्वर मंदिरातील पाच दानपेट्या फोडून रोकड चोरली होती. यात त्याला ठाणे न्यायालयाने एक वर्षाच्या कैदेची शिक्षाही सुनावली होती. ती भोगून आल्यानंतर तो पुन्हा चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेला आहे.