पिस्तुलसह तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 18:07 IST2025-03-12T18:07:14+5:302025-03-12T18:07:33+5:30
आरोपींना पुढील चौकशी व तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पिस्तुलसह तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विनापरवाना विक्री करण्यासाठी पिस्तुलीसह आलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले आहे. आरोपींकडून पोलिसांनी पिस्तुल, मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे आणि वेगनॉर कारसह हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे.
मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे सपोनि सुहास कांबळे यांना माहिती मिळाली की, काही आरोपी पिस्तुल विक्री करण्यासाठी एक वेगनॉर कारमधून नालासोपारा पश्चिमेकडील साई सिटी लगत असलेल्या खारटन परिसरात येणार आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व अंमलदारानी सापळा रचून कारसह आरोपी अब्दुल शेख (२६), सद्दाम शेख (२३) आणि राजकुमार गौतम (२४) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतल्यावर एक पिस्तुल, मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे भेटली. पोलिसांनी वेगनॉर कारसह ३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अंमलदार सुमित जाधव यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पुढील चौकशी व तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे यांनी केली आहे.