आरक्षित भूखंडाचा विकास नाहीच
By Admin | Updated: August 15, 2015 23:15 IST2015-08-15T23:15:34+5:302015-08-15T23:15:34+5:30
कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ५७ मध्ये एकूण ११ आरक्षित भूखंडांंपैकी फक्त २ भूखंडांचा विकास झाला आहे. परंतु, मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ९ मोकळेच असून ते ताब्यात

आरक्षित भूखंडाचा विकास नाहीच
- दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ५७ मध्ये एकूण ११ आरक्षित भूखंडांंपैकी फक्त २ भूखंडांचा विकास झाला आहे. परंतु, मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ९ मोकळेच असून ते ताब्यात न घेतल्यामुळे विकासाची कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तसेच आरक्षण क्र. ४३१ हा भूखंड शाळा व शाळेच्या मैदानासाठी आहे. ही जागा मनपाने ताब्यात घेतल्यामुळे तेथे तिसाई मंदिर येथे असलेल्या बैठ्या खोल्यांमधील शाळा स्थलांतरित केली. ती स्थलांतरित झाली, पण तिच्या जुन्या वास्तूबाबत मनपाने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. सध्या मनपाची जरीमरी प्रा. शाळा व खेळणी असलेले क्रीडांगण त्या आरक्षित भूखंडावर आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या धोरणानुसार शाळेच्या बाजूला अनाथ मुलांसाठी वसतिगृह बांधले आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत बांधलेले वसतिगृह सुसज्ज होऊन बराच कालावधी लोटला तरी शिक्षण मंडळाच्या अनास्थेमुळे हे वसतिगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
वसतिगृहात ५० मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची तसेच ८ बेडचे ३ रॅक, परिपूर्ण स्वयंपाकाची भांडी, मुलांसाठी खेळणी व बाथरूम, १० सीटच्या शौचालयांची व्यवस्था केली आहे. ती पडून आहे. आरक्षण क्र. २९९ या भूखंडावर क्रीडा संकुल व दवाखाना होणार आहे. यासाठी मनपाने मोकळी ३६ गुंठे जमीन ताब्यात घेतली असून आमदार निधीतून तेथे क्रीडा संकुल होणार आहे. सध्या फक्त संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. आमराई चौकात सुशोभित कारंजे बांधले. परंतु, अल्पावधीत समाजविघातक शक्तींच्या उपद्रवामुळे ते बंद पडले. कारंजाभोवती कोणतेही कुंपण नव्हते. त्यामुळे मनपाचे लाखो रुपये वाया गेले आहेत.
या प्रभागाची लोकसंख्या ११ हजार असून १० टक्के चाळी व १० टक्के इमारती आहेत. महाराष्ट्रीयन ९० टक्के, मागासवर्गीय ३ टक्के, उर्वरित ७ टक्के आहेत. वैष्णवी पार्क, श्री हरी कॉम्प्लेक्स, प्रतीक्षा मंगलमूर्ती सोसायटी, तिसाई कॉलनी, सुनीता कॉलनी इत्यादी प्रमुख लोकवस्त्या आहेत. सर्व चाळींना सेफ्टी टँक आहेत. गटारांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. सुनीता कॉलनी, विजयनगर येथे बंदिस्त गटारे आहेत. तर शाळेसमोर कचऱ्याचे ढीग आढळतात. मानव कॉलनी, सत्यम-शिवम-सुंदरम येथे पायवाटा व्हायच्या आहेत.
चेतना हायस्कूल ते नांदिवली महसूल हद्दीपर्यंत १०० फुटी रस्ता तयार असून रहदारी सुरू आहे. परंतु, अद्यापही त्यावर प्रकाश व्यवस्था नाही.