विश्वासावरच सर्व जग अवलंबून, अविश्वासातून होते संशयाची निर्मिती- श्री श्री रविशंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:47 IST2026-01-21T09:45:45+5:302026-01-21T09:47:35+5:30
‘उल्हास उत्सव’ सोहळ्यातून अध्यात्मिक जागर

विश्वासावरच सर्व जग अवलंबून, अविश्वासातून होते संशयाची निर्मिती- श्री श्री रविशंकर
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: जीवनात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वासासाठी ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींवरही विश्वास ठेवावा लागतो. विश्वासावर सर्व जग अवलंबून असून, अविश्वास आल्यास संशय निर्माण होतो. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे आपल्या जीवनात कौशल्य, प्राविण्य येते. त्यातून कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकतो. यशामुळे साहजिकच जीवन अधिक सुंदर होते, अशा शब्दांत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक आणि प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला.
उल्हासनगरमधील गायकवाड पाडा येथे मंगळवारी सायंकाळी ‘उल्हास उत्सव’ या अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री श्री रविशंकर यांची गुरुवाणी ऐकण्यासाठी परिसरातून जनसागर लोटला होता. तणावमुक्त जीवन, ध्यान, अध्यात्मिक शक्ती याबाबत विवेचन करताना त्यांनी विश्वास सर्वांत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मानवी जीवनात आनंद आणि शांतता मिळवण्यासाठी ध्यानाशिवाय पर्याय नाही, असा संदेश त्यांनी दिला.
आत्मविश्वास तीन प्रकारचा आहे. दुसऱ्यावर विश्वास ठेवल्याने जीवनाला गती मिळते. योग करण्यासाठी मन शुद्ध असणे गरजेचे आहे. भारतीय म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाविकांनी विचारलेल्या प्रश्नांचे श्री श्री रविशंकर यांनी निरसन केले. श्री श्री रविशंकर यांच्या गुरुवाणीने भक्त मंत्रमुग्ध झाले होते. सर्व वातावरण अध्यात्मिक झाले होते.
सिंधी समाजाच्या डीएनएमध्ये व्यापार
फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला जन्मभूमी सोडावी लागली. मात्र, आज सिंधी समाज जगभर सामावला आहे. सिंधी समाजाच्या डीएनएमध्ये व्यवसाय आहे.
नोकरी करणारा सिंधी माणूस असू शकत नाही, असे साधारणपणे म्हटले जाते. दक्षिण भारतातील माणूस नोकरीत रमतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मोठे मन
महाराष्ट्राचा माणूस प्रांतवाद सोडून देशवासी बनलेला आहे. महाराष्ट्राचे मन मोठे आहे. विठ्ठलावर सर्व महाराष्ट्राची श्रद्धा आहे. पंढरपूरचा विठोबा सर्व भारताचे दैवत आहे, असेही ते म्हणाले.