चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 19:00 IST2022-03-27T19:00:25+5:302022-03-27T19:00:49+5:30
वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दुचाकीला लावलेल्या जॅमरसह दुचाकी पळवणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले.

चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात
मीरारोड - वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दुचाकीला लावलेल्या जॅमरसह दुचाकी पळवणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले. त्यांच्या विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे .
शुक्रवार २५ मार्च रोजी वाहतूक पोलीस लक्ष्मण शिंदे हे महिला पोलीस सपना थोरात व मेट्रोचे ट्राफिक वार्डन नरेश बामणे, वंदना गोरे असे सायंकाळी कनकिया नाक्या वर कर्तव्यावर होते. यावेळी हॉटेल मनी पॅलेसजवळ दुचाकी वरून दोघे चालले होते. चालकाने हेल्मेट घातले नसल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे वाहन परवाना मागितला असता तोदेखील नव्हता. पोलिसांनी दंड भरा सांगितले तर दंड भरणार नाही असे उद्धट व उलट उत्तर दिले, त्यामुळे पोलिसांनी दुचाकी बाजूला घेत त्याला सरकारी जॅमर लावले.
त्यानंतर शिंदे हे वाहतुकीच्या नियंत्रण कामात व्यस्त झाले, तेव्हा काहीवेळाने वॉर्डनने येऊन सांगितले की, दुचाकीस्वारांनी जॅमरसह दुचाकी पळवून नेली. यानंतर शिंदे यांनी सहकाऱ्यांसह पाठलाग करत रसाज सर्कल येथे दोघांना पकडले. या प्रकरणी एजाज युसुफ सय्यद (२२, रा . केरोलीन बिल्डींग, हटकेश) व एतेशाम रिजवान खान (२०, रा . अलमेल अपार्टमेंट, पटेल कॉम्प्लेक्स, काशीमीरा) या दोघांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .