बसमध्येच भरली शाळा, गिरवताहेत बाराखडी; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘समतोल’ उपक्रम
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 2, 2024 13:26 IST2024-01-02T13:26:21+5:302024-01-02T13:26:34+5:30
‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत.

बसमध्येच भरली शाळा, गिरवताहेत बाराखडी; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘समतोल’ उपक्रम
ठाणे : रोजीरोटीसाठी वीटभट्टी कामगारांना सातत्याने स्थलांतरित व्हावे लागते. त्यामुळे वीटभट्टी कामगारांची कितीतरी मुले शाळाबाह्य आहेत. याच मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी समतोल फाउंडेशनने चक्क शाळाच त्यांच्या दारी नेली आहे. ‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत.
मुरबाडमध्ये ८० वीटभट्ट्या आहेत. हे कामगार आपल्या मुलांना शाळेत पाठवतीलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे ‘स्कूल इन बस’च्या माध्यमातून शाळाच या मुलांच्या दारात नेली, अशी माहिती संस्थेचे सर्वेसर्वा विजय जाधव यांनी दिली. सध्या २५० मुलांपर्यंत पोहोचण्यात संस्थेला यश आले आहे.
ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न तसाच आहे. त्याकडे सरकार कधी पाहणार? आणि अशा मुलांसाठी संस्था तरी किती पुरी पडणार, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला. या मुलांच्या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारला होता. मात्र, अद्याप त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, असे जाधव यांनी सांगितले.
तीन तासांची शाळा
पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या वर्षभरात २५० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, यात ४५ मुलींचा समावेश आहे. या बसला शाळेसारखे स्वरूप दिले आहे. बेंच, बोर्ड, दप्तर सारेच यात आहेत. यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहेत. ही शाळा तीन तास चालते आणि दिवसातून पाच ठिकाणी जाते.
८०० मुले शाळाबाह्य
शिक्षण मिळणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, असे असतानाही कितीतरी मुले ही शाळाबाह्य आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचा दावा सरकारने केला असला, तरी शाळाबाह्य मुलांची संख्या मोठी असल्याचे स्वयंसेवी संघटनांचे म्हणणे आहे. या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. मुरबाड तालुक्यातील वेगवेगळ्या पाड्यांमध्ये वीटभट्टी कामगार स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरामुळे जवळपास ८००
मुले ही शाळाबाह्य आहेत.