राज्यात दंगली घडल्यास सत्ताधारी राहतील जबाबदार: जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:16 IST2025-03-15T08:16:13+5:302025-03-15T08:16:13+5:30
शहरात अनधिकृत बांधकामे वाढायला लागली आहेत, ते थांबविण्याचा प्रयत्न करा

राज्यात दंगली घडल्यास सत्ताधारी राहतील जबाबदार: जितेंद्र आव्हाड
ठाणे : राज्यात दंगली घडल्यास त्याला सत्ताधारी पक्षातील काही नेते जबाबदार असतील, असा आराेप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात गुरुवारी केला. ठाणे पालिकेतील काही अधिकारी हे पैसे वसुलीसाठी गँगवॉर घडवत असल्याचा आराेपही आव्हाड यांनी केला. आयुक्तांनी हे सहन करू नये, अन्यथा तुमच्याच अंगावर हा डाग येईल, असा सल्लाही त्यांनी दिला. आव्हाड यांनी ठाणे पालिका मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला.
शहरात अनधिकृत बांधकामे वाढायला लागली आहेत, ते थांबविण्याचा प्रयत्न करा. यासाठी कशाला जनता दरबार हवा, असा टोलाही आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. गेली ३० वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने जनसंवाद आणि जनता दरबारावरही त्यांनी सडकून टीका केली. ठाणे शहरात कचरा उचलला जातोय का? या शहराला पाणीच नाहीये या समस्या तर सोडवा, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी इतिहासाबद्दल केलेल्या विधानाबद्दल ते म्हणाले, त्यांना महाराष्ट्र पेटवायचाच आहे. आग लावायची आहे.