६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
By सदानंद नाईक | Updated: October 7, 2025 20:31 IST2025-10-07T20:31:02+5:302025-10-07T20:31:40+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन

६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
सदानंद नाईक, उल्हासनगर: पावसाळ्यात ठप्प पडलेल्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी आमदार कुमार आयलानी यांना रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्ता बांधणीसाठी राज्य शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटींचा निधी मंजूर केला. मात्र रस्त्याचे काम गेल्या ३ वर्षापासून रखडल्याने, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांच्या कारभारावर टिका होत आहे. शहरांत सुरू असलेल्या ४५० कोटीच्या निधीतील भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यावर कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काम सुरू करतो. असे सांगणारे मानकर यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम सुरू केले होते. तर पावसाळा सुरू होताच रस्त्याचे काम बंद केले. आमदार कुमार आयलानी यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका बांधकाम विभाग यांची सोमवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीत शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून अधिकाऱ्यांना आयलानी यांनी धारेवर धरले.
शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्यात जीवघेणे खड्डे झाले असून ट्रक व टेम्पोचे चाके रस्त्यात फसल्याच्या घटना घडल्या आहेत. आमदार आयलानी यांनी घेतलेल्या. बैठकीत रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी दिले. तसेच २० कोटीतील नागरी सुविधेची २०० कामाला मुहूर्त लागणार असल्याचे मानकर म्हणाले. शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत महापालिका शहर अभियंता निलेश शिरसाठे यांना उत्तर देता आले नाही. शिरसाठे यांना आमदार आयलानी यांनी चांगलेच धारेवार धरले. त्यांच्या मदतीला कार्यकारी अभियंता संदीप जाधव धावून गेले. रस्त्याचे कामे व समस्या आमदार आयलानी यांना जाधव यांनी समजावून सांगितल्या. एकूणच दिवाळीत रस्ते सुसाट होणार असल्याचे संकेत आमदार आयलानी यांनी बैठकीत देऊन अधिकाऱ्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत.