चाकूच्या धाकावर मोबाइल पळविणाऱ्यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले
By जितेंद्र कालेकर | Updated: September 4, 2023 21:50 IST2023-09-04T21:50:42+5:302023-09-04T21:50:58+5:30
नागरिकांच्या मदतीने केली अटक, मोबाइलही हस्तगत

चाकूच्या धाकावर मोबाइल पळविणाऱ्यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले
ठाणे : चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या उवेज पडाया (३१, रा. मुंब्रा, ठाणे) याला नागरिकांच्या मदतीने अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून चोरीतील आठ हजारांचा मोबाइलही हस्तगत केला आहे.
घाेडबंदर रोडकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मानपाडा पेट्रोल पंपासमोर मानपाडा बस थांबा येथून ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या टीएमटी बसमध्ये शिवसागर जैस्वाल (३३, रा. सायन, मुंबई) चढत होते. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाइल चोरट्याने हिसकावून पळ काढला. त्यावेळी जैस्वाल यांच्यासोबत असलेल्या शिवरतन मोर्या, रामदेव मंडल, सुनील यादव, सुनील पंडित आणि रामसुरत मोर्या आदींनी या चोरट्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूचा धाक दाखवित जवळ याल तर सोडणार नाही, अशी धमकी त्यांना दिली. त्याचवेळी गस्तीवरील कापूरबावडी पोलिसांच्या पथकाने उवेज या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.