वॉर्डांची संख्या आहे तशीच! ठाणे पालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुकांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 08:48 IST2025-08-24T08:47:43+5:302025-08-24T08:48:22+5:30

Thane Municipal Corporation: ठाणे शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार वॉर्डांच्या संख्येत वाढ होईल, याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या सर्वपक्षीय इच्छुकांची घोर निराशा करणारा ठाणे महापालिकेच्या वार्ड रचनेचा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रसिद्ध झाला.

The number of wards remains the same! Disappointment of aspirants from all parties after the draft plan of Thane Municipal Corporation was released | वॉर्डांची संख्या आहे तशीच! ठाणे पालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुकांची निराशा

वॉर्डांची संख्या आहे तशीच! ठाणे पालिकेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वपक्षीय इच्छुकांची निराशा

ठाणे  - शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार वॉर्डांच्या संख्येत वाढ होईल, याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या सर्वपक्षीय इच्छुकांची घोर निराशा करणारा ठाणे महापालिकेच्या वार्ड रचनेचा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रसिद्ध झाला. २०१७ प्रमाणेच, महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक वॉर्ड असे ३२ वॉर्ड, तर केवळ एक वार्ड तीन सदस्यांचा असे एकूण ३३ वार्ड असतील. ठाणे शहराची लोकसंख्या वाढली असली, तरीही नगरसेवकांची संख्या १३१  राहणार आहे.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली, तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे.  पालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप वॉर्ड रचना तयार केली होती. तीन सदस्यांचा एक वॉर्ड याप्रमाणे ही रचना होती. या रचनेनुसार पालिकेने वॉर्ड आरक्षण प्रक्रिया पार पाडली होती. महापालिकेत १४२ नगरसेवक निवडून जाणार होते. मात्र, राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली. महाविकास आघाडी तीन सदस्यीय वार्डासाठी आग्रही होती, तर महायुती मात्र त्याविरोधात आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर महायुतीने वॉर्ड रचना रद्द केली.  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली.  

सर्वांत मोठा आणि लहान वॉर्ड 
कळव्यातील वॉर्ड क्रमांक २५ हा सर्वांत मोठा वार्ड ठरला आहे. याठिकाणची लोकसंख्या ६२ हजार ६९७ एवढी आहे,  तर सर्वांत छोटा वॉर्ड दिव्यातील प्रभाग क्रमांक २९ ठरला आहे. या ठिकाणी तीन सदस्य पालिकेत निवडून जाणार असून, येथील लोकसंख्या ही ३८ हजार १७२ एवढी आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम
२१ ऑगस्ट - प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता.
२ ते ८ सप्टेंबर - प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती.
९ ते १५ सप्टेंबर - पुन्हा नगरविकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर होणार.
१६ ते १७ सप्टेंबर - अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठविणार.
३ ते ६ ऑक्टोबर - अंतिम रचना जाहीर होणार

Web Title: The number of wards remains the same! Disappointment of aspirants from all parties after the draft plan of Thane Municipal Corporation was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.