फेरीवाल्यांच्या वादातून घडलेल्या हत्याकांडातील गोळी झाडणारा फेरीवाला पंजाब मधून ४ महिन्यांनी अटकेत
By धीरज परब | Updated: May 5, 2025 21:11 IST2025-05-05T21:11:12+5:302025-05-05T21:11:39+5:30
Mira Road News: मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वादातून एकाची डोक्यात गोळीझाडून हत्या करणारा हल्लेखोर फेरीवाल्यास ४ महिन्यांनी पंजाब मधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथकास यश आले आहे.

फेरीवाल्यांच्या वादातून घडलेल्या हत्याकांडातील गोळी झाडणारा फेरीवाला पंजाब मधून ४ महिन्यांनी अटकेत
मीरारोड - मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वादातून एकाची डोक्यात गोळीझाडून हत्या करणारा हल्लेखोर फेरीवाल्यास ४ महिन्यांनी पंजाब मधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. मीरारोड रेल्वे स्थानक परिसर, सार्वजनिक रस्ते व स्कायवॉक वर फेरीवाले बसवण्या पासून जागा आणि भाडे उकळणे ह्या सारखे प्रकार चालले होते. फेरीवाल्यांच्या ह्या वादातून नया नगर पोलीस ठाण्यात काही गुन्हे देखील दाखल झाले होते.
त्यातूनच शुक्रवार ३ जानेवारीच्या रात्री शांती शॉपिंग सेंटर मध्ये शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी उर्फ सोनू ( ३५ ) ह्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती . या प्रकरणी फेरीवाला मोहम्मद युसूफ मन्सूरअली आलम ( वय ३४ वर्षे ) रा . नया नगर , मीरारोड, सैफअली मन्सूरअली खान ( वय २२ ) व तबस्सुम परवीन उर्फ शमा रा . नालासोपारा ह्या तिघांना अटक केली होती. शमा हिने सैफ ह्याला शस्त्रा सहतिच्या घरात लपवून ठेवले होते व घरातून देशी बनावटीची पिस्तूल, ६ जिवंत बुलेट जप्त केली गेली होती.
सोनूवर गोळी झाडणारा फेरीवाला सचिन कुमार साहू उर्फ राठोड ह्याचा मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ठिकठिकाणी शोध घेत होती. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. साहू हा मीरारोड रेल्वे स्थानक जवळ भेलपुरीचा धंदा लावायचा.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या मार्गदर्शनाखाली देखील साहू ह्याला पकडण्यासाठी शोधकार्य सुरु होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे सह शकील पठाण, राजवीर संधु यांचे तपास पथक काम करत होते.
पोलिसांनी गोपनीय माहिती सह तांत्रिक विश्लेषणावर मेहनत घेतली. सातत्याच्या प्रयत्ना नंतर साहू ह्याच्या गावच्या आणि नया नगर भागातील एकास पंजाबच्या भटिंडा येथून नेहमी कॉल येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना खात्री पटताच ४ मे रोजी पोलिसांचे पथक पंजाबच्या भटिंडा येथील तलवंडी साबो गावात स्थानिक पोलिसांसह दाखल झाले.तेथे एकास साहू ह्याचा फोटो दाखवताच त्याने पोलिसांना साहू राहत असलेल्या वीटभट्टीवर नेले. साहू हा झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. साहू हा हत्या करून आला आहे याची माहिती तेथील काही कामगारांना होती असे सूत्रांनी सांगितले.
हत्या केल्या नंतर तो अनेक ठिकाणी पळत फिरत होता. गेल्या सव्वा दोन महिन्या पासून तो सदर वीटभट्टी येथे राहत होता. तेथे मिळेल ते काम करायचा. खंडणी विरोधी पथकाने त्याला पंजाब वरून अटक करून आणत मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे. युसूफ ने सांगितले म्हणून सोनूला ठोकून टाकले. शस्त्र देखील युसुफने पुरवले होते असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. युसुफच्या सोबत असलेल्या मैत्री खातर कि सुपारी घेऊन साहू ह्याने हत्या केली ? हे अजून स्पष्ट झालेले नाही.