President Cup India 2026” टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा.!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 22:32 IST2026-03-31T22:28:33+5:302026-03-31T22:32:43+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची उपस्थिती !

President Cup India 2026” टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा.!
लोकमत न्यूज नेटवर्क : ठाणे
टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India - 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज, गुरुवार ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
टेनिस क्रिकेटपटूना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आयटीसीएसएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचे कौतुक केले. तर अशा पद्धतीचे उपक्रम आयोजित होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासाठी आजवर ५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
तर यावेळी अनेक वर्षानी आपण ठाण्यात आलो आहोत. ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटले. आज ठाणे हे बांद्र्या पेक्षा ही अधिक उत्तम दिसू लागले असल्याचे अभिनेते सलमान खान यांनी सांगितले.
टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे. आर्थिक दृष्टया देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच हेतून स्पर्धेची विजेती रक्कम देखील १ कोटी करण्यात आली असल्याचे ही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्स हा पहिला सामना पार पडला.
आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. आज ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ‘President Cup India’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे.
टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, डॉ.ज्योती वाघमारे, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सूनंदन लेले यांच्यासह सर्व संघाचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.