एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 06:54 IST2025-02-10T06:54:08+5:302025-02-10T06:54:48+5:30

मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

The goal is to provide 'five star' service in ST too; Deputy CM Eknath Shinde assures | एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे : राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) महामंडळाचा चेहरामाेहरा बदलून अगदी फाइव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. खाेपट बसस्थानकातील चालक, वाहकांच्या वातानुकूलित  विश्रांतिगृहाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. असेच विश्रांतिगृहाचे राेल माॅडेल राज्यभर राबविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम केले पाहिजे. प्रवाशांना एअरपोर्टसारखे बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खासगी, सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. तसेच मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यभरात सार्वजनिक, खासगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा  संकल्प असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसादिनी या योजनेचा  प्रारंभ करीत असल्याचेही ते म्हणाले. भविष्यात या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह विविध वैद्यकीय सेवासुविधा एसटीच्या  कर्मचाऱ्यांना माेफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्यांनाही मिळणार आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस.टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव आदी उपस्थित होते.

 

Web Title: The goal is to provide 'five star' service in ST too; Deputy CM Eknath Shinde assures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.