त्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील पोलिसांचे वाहन देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:08 IST2024-05-21T13:07:46+5:302024-05-21T13:08:25+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते.

त्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील पोलिसांचे वाहन देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे धावून गेले. जखमी महिलेला पुढील उपचारासाठी ताफ्यातील पोलिस वाहन देऊन तिला कळवा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते.
सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा-भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले.
कळवा रुग्णालयात दाखल करण्याची सूचना
अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ ताफा थांबवून ते महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्यांना डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ वाहनातून पाणी आणून दिले. त्यानंतर ताफ्यातील पोलिस वाहन देऊन तिला कळवा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.