ठाण्यात दारूच्या नशेत मोठ्या भावाचा खून करणाऱ्यास अटक; दोन दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 22:51 IST2019-10-29T22:51:25+5:302019-10-29T22:51:41+5:30
ऐन पाडव्याच्या दिवशीच घडली घटना
_201707279.jpg)
ठाण्यात दारूच्या नशेत मोठ्या भावाचा खून करणाऱ्यास अटक; दोन दिवस कोठडी
ठाणे : आई आणि नशेत असलेला लहान भाऊ अजय (३८) यांच्यातील वाद सोडविण्यात मध्यस्थी करणाºया नितीन घोगळे (४०) या मोठ्या भावाचाच अजयने चाकूने भोसकून खून केल्याची घटना ऐन पाडव्याच्या दिवशी कळव्यातील जानकीनगर भागात घडली. याप्रकरणी आरोपी अजय याला कळवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सोमवारी अटक केली आहे.
कळव्यातील मातोश्री जानकीनगर चाळ क्रमांक सहा, रूम क्रमांक दोन मनिषानगर येथील गेट क्रमांक एकच्या जवळ घोगळे कुटूंब वास्तव्याला आहे. अजय आणि नितीन हे दोघे सख्खे भाऊ असून अजयला दारुचे व्यसन आहे. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेएक वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेतील अजयला त्याची आई नूतन हिने जेवणाचे ताट वाढले होते. ते दिल्यानंतर जेवणावरूनच त्याने आईला शिवीगाळ करून तिच्याशी वाद घातला. त्यांचे हे भांडण सोडविण्यासाठी नितीनने मध्यस्थी केली. ती केल्याचा राग येऊन घरातील टेबलावर ठेवलेल्या चाकूने त्याच्या डाव्या छातीवर वार करून गंभीर जखमी केले. त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पती नितीन यांच्या खून प्रकरणी सुरेखा घोगळे (३६) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अजयला अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.