ठाण्याचा पालकमंत्री महायुतीचाच होणार; पक्षश्रेष्ठीच घेतील निर्णय - कपिल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 06:31 IST2019-10-26T23:14:25+5:302019-10-27T06:31:50+5:30
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी करणे रास्त आहे. असे असले तरी विधानसभा व लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप महायुती एकत्रितपणे लढली आहे

ठाण्याचा पालकमंत्री महायुतीचाच होणार; पक्षश्रेष्ठीच घेतील निर्णय - कपिल पाटील
कल्याण : ठाणे जिल्ह्यात भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना-भाजप महायुती असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा महायुतीचाच असेल, असा दावा भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या तुलनेत शिवसेनेचे कमी उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री भाजपच्या आमदाराला मिळावे, अशी मागणी केली जात आहे.
याविषयी पाटील यांना विचारले असता, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी करणे रास्त आहे. असे असले तरी विधानसभा व लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप महायुती एकत्रितपणे लढली आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळाल्या हे गणित असले तरी पालकमंत्री शिवसेनेचा का भाजपा, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री कोणत्या पक्षाचा असेल हे ठरवतील. त्यामुळे पालकमंत्री हा महायुतीचा असेल. अद्याप सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेला नाही. त्यानंतरच पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाणार आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकरच
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण -मुरबाड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर मंजूर झाला आहे. त्याचे टेंडर काढून प्रकल्पाचे काम आठ महिन्यांत सुरू केले जाईल. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग पुढे अहमदनगरपर्यंत नेण्याचा प्रयत्न राहिल. १८ नोव्हेंबरपासून संसदीय अधिवेशन सुरू होणार असून, त्यात भिवंडी मतदारसंघातील काही विषय मांडणार असल्याचे पाटील म्हणाले.
दिवाळी पहाट : पश्चिमेतील साई चौकात कपिल पाटील फाउंडेशनतर्फे सोमवारी दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहे. त्यात पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर उपस्थित राहणार आहे. खोलगडे अर्धा तास गाणी सादर करणार आहेत. तर, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे हे हास्याचे फटाके फोणार आहेत.