ठाणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केली सात वाहनांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:46 IST2020-09-20T23:42:16+5:302020-09-20T23:46:45+5:30
अनेक व्यवहार आता पूर्वपदावर येत असतांनाच चोरटयांचाही सुळसुळाट सुरु झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतीच्या ठिकाणी उभी केलेली सात वाहने शहरातील विविध भागांमधून चोरटयांनी गेल्या दोन दिवसांमध्ये लांबविली आहेत.

‘अनलॉक’नंतर चोरटयांचाही सुळसुळाट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली अनलॉकची प्रक्रीया आता वेगाने सुरु आहे. अनेक व्यवहार आता पूर्वपदावर येत असतांनाच चोरटयांचाही सुळसुळाट सुरु झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतीच्या ठिकाणी उभी केलेली सात वाहने शहरातील विविध भागांमधून चोरटयांनी गेल्या दोन दिवसांमध्ये लांबविली आहेत. यामध्ये दुचाकी आणि रिक्षा यांचाही समावेश आहे. असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी उभी केलेली वाहने भरदिवसाही चोरीचे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत. ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव जवळील अण्णा मद्रासी चाळीत राहणारे अमित चौधरी यांनी १३ सप्टेंबर रोजी चंदनवाडी परिसरात त्यांची रिक्षा उभी केली होती. ही रिक्षा चोरट्यांनी बनावट चावीच्या आधारे चोरली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत कळवा पारसिकनगर भागात राहणाºया विद्याधर प्रभू यांनी त्यांची रिक्षा १५ सप्टेंबर रोजी पारसिकनगर येथील रघुकुल सोसायटीसमोर उभी केली होती. या रिक्षाचीही चोरी झाली आहे. याप्रकरणीही १९ सप्टेंबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, टिटवाळा येथे राहणारे जगजीत सिंग यांनी त्यांची एक लाख दहा हजारांची मोटारकार कळव्यातील ‘राणा टॉवर’च्या मागे उभी केली होती. दरम्यान, अशाच प्रकारे शुक्र वार आणि शनिवारीही चार वाहने चोरीस गेल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलिकडेच कोपरी पोलिसांनी दुचाकी चोरणा-या टोळीला जेरबंद केले होते. तरीही वाहन चोरीचे प्रकार वाढत असल्याने वाहन धारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.