Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:32 IST2025-10-28T14:29:51+5:302025-10-28T14:32:00+5:30
Thane Kapurwadi Crime: प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर गर्लफ्रेन्डच्या घरात घुसून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली.

AI Image
ठाणे: प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय प्रेयसीला जाळून टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना ठाण्यातील कापूरबावडी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात मुलगी ८० टक्के भाजली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कापूरबावडी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
१७ वर्षीय पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती पूर्वी मुंबईतील चेंबूर येथे राहत असताना तिची आरोपी मुलाशी ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीजेसाठी चेंबूरला गेली असता, आरोपी मुलाने तिच्याशी भांडण केले आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नातेवाईकांनी हस्तक्षेप करून मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी मुलाने "तुला जिवंत सोडणार नाही" अशी तिला धमकी दिली.
या घटनेनंतर मुलगी घाबरली होती. २४ ऑक्टोबर रोजी ती ठाण्यातील तिच्या घरी एकटी असताना, अचानक घरातून धूर येऊ लागला. शेजाऱ्यांनी मुलीच्या आईला याची माहिती दिली. कुटुंबीय घरी परतले तेव्हा आरोपी मुलगा घरात आढळला आणि मुलगी वेदनेने ओरडत होती. कुटुंबाने तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीयांनी त्याला जाब विचारताच आरोपी मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. पीडित मुलीच्या आईने कापूरबावडी पोलिस ठाण्यात आरोपी मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १७ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून प्रेमसंबंधातून त्यांच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC), २०२३ च्या कलम १०९ (दुष्प्रेरणा) आणि ३५१(२) (इजा पोहोचवण्याच्या प्रयत्नाचा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. मुलीच्या जबाबानंतर घटनेमागील नेमके कारण काय होते? याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.