Thane: ठाण्यात एसटीच्या बसला शॉर्टसर्किटमुळे आग, सुदैवाने ७० प्रवाशी बचावले
By जितेंद्र कालेकर | Updated: October 28, 2022 19:39 IST2022-10-28T19:37:06+5:302022-10-28T19:39:06+5:30
Thane News: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास घडली.

Thane: ठाण्यात एसटीच्या बसला शॉर्टसर्किटमुळे आग, सुदैवाने ७० प्रवाशी बचावले
- जितेंद्र कालेकर
ठाणे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास घडली. या बसमधून प्रवास करणाºया सुमारे ७० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले असून बसला लागलेली आग बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवाशी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने तातडीने नियंत्रणात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातून भिवंडीला जाणारी ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची भिवंडी डेपोची बस चालक आनंद विठोबा सवारे आणि वाहक गणपत बिराजदार हे दोघे ७० प्रवासी घेऊन जात होते. बस टेंभी नाक्याजवळ येताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी तातडीने याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तर बस चालक वाहक आणि स्थानिक नागरिकांनी बसमधील सुमारे ७० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर तातडीने नियंत्रण मिळविले. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठे अनर्थ टळल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.