Thane Rain Red Alert: ठाणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची मुसळधार सुरूच आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, महापालिकेने शाळा-महाविद्यालये आणि खासगी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना (पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी सोमवारी दुपारीच याबद्दलचे आदेश काढले.
मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही मंदावली होती.
गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर वाढल्याने आणि निचरा मर्यादित स्वरुपात होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांचे कालवे झाले होते.
ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने मंगळवारी म्हणजे १९ ऑगस्ट रोजी ठाणे शहर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी अतिसतर्कतेचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. २० ऑगस्ट रोजीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून, महापालिकेने सर्व नागरिकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे कृपया टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.