ठाणे पोलिसांनी ११६ जणांवर केली तडीपारीची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: November 19, 2024 20:12 IST2024-11-19T20:11:24+5:302024-11-19T20:12:02+5:30
चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचा बडगा

ठाणे पोलिसांनी ११६ जणांवर केली तडीपारीची कारवाई
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी ठाणे पोलिसांनी जशी कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे, त्याप्रमाणे दहशत माजविणाऱ्या स्थानिक गुंडांवरही तडीपारीची कारवाई केली आहे. संपूर्ण ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातून गेल्या महिनाभरात ११६ गुंडांवर तडीपारीची तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलमानुसार चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी मंगळवारी दिली.
निवडणूकीसाठीची मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडावी, यादृष्टीने ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील ३५ पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर एमपीडीए कायद्याखाली सहा जणांना बाहेरील जिल्हयातील कारागृहात स्थानबद्ध केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२४ कलम १२६, १२८ आणि १२९ नुसार चार हजार ८१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
महाराष्ट्र पोलिस अधिनियमाखाली ५५, ५६ आणि ५७ नुसार ११६ गुंडांना ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्हयातून हद्दपारीची कारवाई केली. तर बेकायदेशीर दारु तस्करी करणाऱ्या १६१ जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ अन्वये कारवाई केली आहे.