वांगणीमध्ये पोलिसांनी हस्तगत केला अवैध विदेशी मद्याचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:21 IST2018-12-20T22:11:55+5:302018-12-20T22:21:51+5:30
ठाणे जिल्हयातील वांगणी भागातून रिक्षामधून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या हौसला ठाकूर (सिंग) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून बुधवारी अटक केली.

ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे: अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथे ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून अवैध विदेशी मद्याचा साठा बुधवारी दुपारी हस्तगत केला. विदेशी दारुचा माल आणि रिक्षा असा एक लाख २७ हजार १५० रुपयांचाा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वांगणी परिसरात विनापरवाना विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती या भागात पेट्रोलिंग करणाºया सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे यांच्यासह उपनिरीक्षक बजरंग राजपूत, हवालदार धनाजी कडव, रविंद्र चौधरी, गोरक्षनाथ मुंढे आणि अमोल कदम आदींच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास बदलापूर ते वांगणी जाणाºया रस्त्यावर स्मशानभूमीजवळ सापळा रचून हौसला ठाकूर (सिंग) याच्या रिक्षातून हे विदेशी मद्य जप्त केले. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकूरला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.