चोरीचा माल विकत घेणा-या व्यापा-यासह तिघांना अटक : ठाणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:32 IST2017-12-25T17:25:44+5:302017-12-25T17:32:39+5:30
भिवंडीतील गोदामांमधून पाच लाख तीन हजार ५४१ रुपयांच्या एलइडी लाईटची चोरी ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. चोरीचा माल घेणा-या व्यापा-यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे पोलिसांची कारवाई
ठाणे: चोरीचा माल विकत घेणा-या ठाण्यातील व्यापा-यासह महंमद उर्फ एम.डी. जिरु शेख (३५, रा. भिवंडी) आणि बब्बर गोसम खान (३६, रा. मुंब्रा) अशा तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांना २६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
भिवंडीतील वळगाव परिसरात पद्मावती कम्पाऊंडमधील प्रेरणा कॉम्पलेक्स मध्ये प्रियांक गेसोटा यांच्या प्रोफेशनल केअर या के ५ आणि ५ वेअरहाऊस मध्ये १ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत चोरी झाली होती. गोदामाच्या शटरची कुलूपे तोडून चोरटयांनी नामांकित कंपन्यांचे एलइडी लाईटचे पाच लाख तीन हजार ५४१ रुपयांचे ५७ बॉक्स चोरले होते. याप्रकरणी गोदामाचे सुपरवायझर जय गुप्ता यांनी नारपोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. नारपोली पोलीस आणि मालमत्ता गुन्हे शोध पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरु असतांना याच परिसरातील दोन कामगार चोरीच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला महंमद उर्फ एमडीला सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, उपनिरीक्षक बाबासाहेब मुल्ला आणि कॉन्स्टेबल अरविंद शेजवळ आदींच्या पथकाने मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे बब्बर खान याला त्याच्या मुंब्य्रातील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने या चोरीची कबूली देतांनाच अन्य तीन साथीदारांसह ही चोरी केल्याची कबूली दिली. शिवाय, मुंब्रा येथील व्यापारी रोशन उर्फ राजू ओटरमल जैन (४०) या राजू इलेक्ट्रीकल्सच्या दुकानदारास हा संपूर्ण माल एक लाख ३२ हजार ६०० मध्ये विकल्याचेही सांगितले. त्यानुसार चव्हाण यांच्या पथकाने राजूला मुंब्य्रातील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याने विकत घेतलेला सर्वच्या सर्व ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला. त्यांच्या आणखी तीन साथीदारांचा शोध घेण्याा येत असून उपनिरीक्षक मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.