ठाण्याला लॉकडाऊनचीच गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:52+5:302021-03-22T04:36:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला ...

ठाण्याला लॉकडाऊनचीच गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आजही गर्दी दिसत आहे. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी घेण्याचा नियम असतानाही तीन ते पाच प्रवासी बसवले जात आहेत. परिवहनच्या बसमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातल्या त्यात हॉटेलचालक मात्र रात्री साडेअकरा वाजता शटर डाऊन करुन पालिकेला सहकार्य करत असल्याचे दिसत आहे. परंतु येऊर, घोडबंदर भागातील ढाबे रात्री एक ते दोनपर्यंत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिका हद्दीत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. या रुग्णांसाठी पालिकेने कोविड सेंटरमध्ये ४ हजार २२१ बेड आरक्षित केले आहेत. त्यानुसार मागील १९ दिवसांत शहरात ५ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत शहरात ३०० ते ५०० रुग्ण दिवसाला आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्यास सुरुवात केली आहे. ठाणेकरांना मात्र याची तमाच नसल्याचे पाहणीत दिसून आले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. रिक्षातून दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तीन प्रवासी घेऊन जातात, तर शेअर रिक्षांवर जास्तीचे प्रवासी नेल्यास कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवासी आजही वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नेले जात आहेत. दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून एका सीटवर एक प्रवासी असे स्पष्ट करण्यात आले असतानाही बस भरून जाताना दिसतात. त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
...............
घोडबंदर, येऊरला मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरु
हॉटेल व्यावसायिक मात्र महापालिकेने रात्री साडेअकराच्या आधी शटर डाऊन करतात. परंतु येऊर किंवा घोडबंदर भागातील ढाबे, पब रात्री एक ते दोनपर्यंत राजरोस सुरू असून, त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यातही अनेक मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणी सकाळ किंवा सायंकाळच्या सत्रात फेरफटका करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून ते तोंडाला मास्क लावताना दिसत नाहीत. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनचीच गरज असल्याचे दिसत आहे.