ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक; म्हणते, ‘सीसीटीव्ही’ दुरुस्ती पेलवेना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:21 IST2024-12-13T06:21:13+5:302024-12-13T06:21:24+5:30
२५ लाखांचा निधी नाही : भिस्त पोलिसांच्या ६ हजार कॅमेऱ्यांवर

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक; म्हणते, ‘सीसीटीव्ही’ दुरुस्ती पेलवेना !
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने विविध माध्यमांतून शहरात १,७३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; परंतु आता कॅमेऱ्यांची निगा आणि देखभाल करणे पालिकेला शक्य नसल्याने मार्च महिन्यात ३०० कॅमेरे बंद पडले. आता आणखी ११३ कॅमेरे बंद पडले. कॅमेऱ्यांची दुरुस्ती, नवे कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेकडे निधीच नाही. दुरुस्तीसाठी लागणारा २५ लाखांचा निधी खर्च करायला पालिका तयार नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून नव्याने लावण्यात येणाऱ्या सहा हजार कॅमेऱ्यांमध्ये हे बंद पडलेले कॅमेरे बदलून मिळावे, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली.
पालिका हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने पालिकेने ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात १,७३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जाते. मात्र दुरुस्तीअभावी यातील अनेक कॅमेरे बंद पडले आहेत.
पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक
मार्चमध्ये आयुक्त सौरभ राव यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेतला असता, ३०० हून अधिक कॅमेरे बंद असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.
कॅमेरे काही प्रमाणात दुरुस्त केल्याचा दावा संबंधित विभागाने केला. त्यानंतरही आता शहरातील ११३ कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.
या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसविण्याचा खर्च तर अशक्य आहे. दुरुस्ती आणि काही ठिकाणी कॅमेरे बदलणे याचा खर्च २५ लाखांच्या आसपास आहे.
पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा खर्च पालिकेला करता येणे शक्य नसल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘त्या’ विनंतीला पोलिस अनुमती देणार का?
दुसरीकडे, यावर उपाय म्हणून पालिकेने एक शक्कल लढविली आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयात उच्च दर्जाचे तब्बल सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
पालिकेने पोलिसांना पत्र धाडले असून, पालिका हद्दीत ज्या ठिकाणी कॅमेरे बंद पडले आहेत, त्या ठिकाणी पोलिसांनी कॅमेरे बसवावेत, अशी विनंती केल्याची माहिती आहे. पोलिस प्रशासन त्याला अनुमती देणार का, याकडे लक्ष लागले आहे.